Icc Champions Trophy 2025 : टीम इंडियाच्या ‘चॅम्पियन्स’ खेळाडूचं मुंबई विमानतळावर स्वागत, रोहितला पाहण्यासाठी तुफान गर्दी

 

Team India Rohit Sharma Grand Welcome at Mumbai Airport : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचं मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी विमानतळावर एकच गर्दी केलीय.



टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात रविवारी 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने अंतिम सामन्यात विजयासाठी मिळालेलं 252 धावांचं आव्हान हे 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. टीम इंडियाच्या या विजयानंतर खेळाडूंनी एकच जल्लोष केला. तसेच भारतात ठिकठिकाणी क्रिकेट चाहत्यांकडून टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. त्यांनतर आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मायदेशात परतला आहे. भारतीय खेळाडूचं मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.

टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कप 2024 ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं होतं. तेव्हा संपूर्ण भारतीय संघाचं स्वागत केलं गेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा खेळाडू या महाविजयानंतर आपल्या राज्यात जाणार आहेत. त्यानुसार कर्णधार रोहित मुंबईत परतला. तसेच रोहितनंतर थोड्याच वेळात मुंबईकर श्रेयस अय्यर आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या या दोघांचं आगमन होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

रोहितला पाहण्यासाठी तुफान गर्दी

रोहितची एक झळक पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली. रोहितचं मोठ्या बंदोबस्तात विमानतळावर आगमन झालं. यावेळेस रोहितसोबत त्याची मुलगी समायरा दिसून आली. तसेच रोहितची पत्नी रितीकाही होती. रोहित आणि कुटुंबिय मोठ्या बंदोबस्तात त्याच्या वाहनापर्यंत आले. त्यानंतर रोहित स्वत: गाडी चालवत विमानतळावर निघून गेला.

रोहितची निर्णायक खेळी

रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फलंदाज म्हणून लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र रोहितने मोक्याच्या क्षणी अंतिम सामन्यात धमाका केला. रोहितने त्याला हिटमॅन का म्हणतात? हे दाखवून दिलं. रोहितने शुबमन गिल याच्यासोबत शतकी भागीदारी केली. तसेच टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रोहितने 83 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी अशी होती टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.

No comments

Powered by Blogger.