H1N1: देशात पुन्हा ‘स्वाईन फ्लू’चा धोका, 516 जणांना संक्रमण, 6 रुग्णांचा मृत्यू

 

Swine Flu H1N1 Virus: 2024 मध्ये 20 हजार 414 लोकांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 347 जणांचा मृत्यू झाला. या अहवालानुसार, 2019 मध्ये सर्वाधिक 28,798 प्रकरणे नोंदवली गेली. त्यात 1,218 लोकांचा मृत्यू झाला होता.



Swine Flu H1N1 Virus: देशात पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. एच1एन1 व्हायरसचे संक्रमण वाढत आहे. देशातील आठ राज्यांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रसार वेगाने होत आहे. जानेवारी 2025 मध्ये 16 राज्यांमधील 516 जणांना स्वाइन फ्लू झाला. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूमुळे सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. या ठिकाणी चार जणांचा मृत्यू जानेवारी महिन्यात झाला आहे. त्यानंतर कर्नाटक, हिमाचल प्रदेशात एक-एक जणाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) च्या अहवालानुसार दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधील परिस्थिती गंभीर आहे.

महाराष्ट्रात किती रुग्ण

तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांमध्ये स्वाईन फ्लूबाबत निगराणी वाढवण्याचे आवाहन एनसीडीसीकडून करण्यात आले आहे. तामिळनाडूमध्ये 209, कर्नाटकात 76, केरळमध्ये 48, जम्मू आणि काश्मीरमध्ये 41, दिल्लीत 40, पुद्दुचेरीमध्ये 32, महाराष्ट्रात 21 आणि गुजरातमध्ये 14 रुग्ण आढळले आहेत.

मागील वर्षी 347 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला NCDC ने अहवाल दिला आहे. त्या अहवालात म्हटले आहे की, 2024 मध्ये 20 हजार 414 लोकांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 347 जणांचा मृत्यू झाला. या अहवालानुसार, 2019 मध्ये सर्वाधिक 28,798 प्रकरणे नोंदवली गेली. त्यात 1,218 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकारच्या आजारासाठी केंद्र सरकारने आधीच एक टास्क फोर्स तयार केला आहे. टास्क फोर्समध्ये आरोग्य मंत्रालय, एनसीडीसी, आयसीएमआर, दिल्ली एम्स, पीजीआई चंडीगढ, निम्स बंगळुरूसह विविध विभागातील अधिकारी आहेत. एच1एन1 हा एक इन्फ्लूएंजा व्हायरस आहे. त्याला स्वाइन फ्लू नाव दिले आहे.


No comments

Powered by Blogger.