मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी Good News! आता 15 डब्बा लोकल...
Mumbai Local Train Big Update: मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Mumbai Local Train Big Update: जगातील सर्वाधिक गर्दी असलेली सर्वाजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून मुंबईच्या लोकल ट्रेन ओळखल्या जातात. याच मार्गावरील मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकलकरिता प्लॅटफॉर्मची क्षमता वाढविण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 च्या विस्तारासाठी अडसर ठरणारी जुनी रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) इमारत पाडण्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळेच आता 15 डब्यांच्या लोकल ट्रेनच्या मुख्य मार्गावरील 22 अतिरिक्त सेवांसह एकूण 44 फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
11 कोटी 11 लाखांचा खर्च
मध्य रेल्वेने सीएसएमटी येथील सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत करून तेथे इलेक्ट्रिकल इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू केली आहे. सिग्नलिंगचे सर्व कामकाज जुलैमध्ये प्लॅटफॉर्म 18 जवळच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केले. त्यामुळे सिग्नलिंगची जुनी आरआरआय इमारत रिकामी झाल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 जवळची सुमारे 400 चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. प्लॅटफॉर्म 5 आणि 6 ची लांबी वाढविण्यासाठी या जागेचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटी 11 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी 100 मीटरने वाढणार आहे. सध्या हे दोन्ही प्लॅटफॉर्म प्रत्येकी 290 मीटर लांबीचे असून त्यांची लांबी 390 मीटर इतकी होणार आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून 15 डब्यांच्या लोकल चालविण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
या दोनच जागी सध्या उभ्या राहतात 15 डब्बा ट्रेन
15 डब्यांची लोकल उभी करण्यासाठी सानपाडा कारशेड आणि सीएसएमटीतील प्लॅटफॉर्म 7 या दोनच जागा आहेत. सध्या 15 डब्यांच्या लोकलच्या कल्याणपर्यंत 22 फेऱ्या चालविण्यात येतात. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. सीएसएमटीतील दोन प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्याने सेवांची दुपटीने वाढ करण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.
विस्तारीकरण करताना ही कामंही करावी लागणार
प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी योग्य जागा, यार्ड रिमॉडेलिंग आणि क्रॉस ओव्हर पॉइंट्स यासारख्या तांत्रिक गोष्टींचाही विचार करावा लागतो. तसेच सिग्नल यंत्रणेत बदल करणे आवश्यक असते. हे काम गुंतागुंतीचे असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जुनी रूट रिले इंटरलॉकिंग इमारत पाडल्यानंतर प्लॅटफॉर्म विस्ताराची कामं सुरु होतील.
Post a Comment