रामदेव बाबांच्या फूड पार्कमुळे विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, संत्र्याला मिळणार मोठा भाव
नागपूर येथे पतंजलीचे नवीन फूड पार्क उघडण्यात आले आहे. यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. संत्र्याला चारपट अधिक भाव मिळणार असल्याने शेतकरी मालामाल होतील. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. या पार्कमध्ये संत्र्याचे प्रक्रियाकरण आणि निर्यातही केली जाणार आहे.
प्रसिद्ध योग गुरू रामदेव बाबा यांच्या फूड पार्कचं आज नागपुरात दणक्यात उद्घाटन करण्यात आलं. या फूड पार्कमुळे विदर्भासह देशातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. या फूड पार्कमुळे संत्र्याला चारपटीने अधिक भाव मिळणार आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मालामाल होणार आहे. तसेच केवळ महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनाही या फूडपार्कचा मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान, नागपूर येथील आशियातील प्रथम आणि देशातील सर्वात मोठे फूड प्रोसेसिंग यूनिट असलेल्या ‘पतंजली फूड व हर्बल पार्क’च्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी योग गुरु स्वामी रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबा यांच्या या फूड पार्कचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
आता तसं होणार नाही
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पतंजलीला मिहानमध्ये मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करा अशी विनंती केली होती. विदर्भात 10 हजाराहून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याचं कारण शेतकरी सोयाबीन, कापूस आणि संत्रा पीक घेतात. मात्र योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. पण आता तसं होणार नाही. जो संत्रा 3 ते 4 रुपयांनी विकला जातो. तोच संत्रा पतंजलीकडून 18 रुपयांनी खरेदी केला जाणार आहे. तशी घोषणाच पतंजलीने केली आहे. त्यामुळे चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळणार आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले.
वर्कशॉप घेणार
येणाऱ्या काळात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच वर्कशोप घेण्यात येणार आहे. रामदेव बाबा आपणास लागणारा संत्रा आम्ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहोत. बांगलादेश सरकार 85 टक्के कर लावत असल्याने निर्यात महाग पडते. बीज आणि फ्लॅगमध्ये बदल होणार नाही तोपर्यंत उत्पादन वाढणार नाही. एका एकरमध्ये 30 टन संत्र्यांचं उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे, असंही गडकरी म्हणाले.
शेतकऱ्यांना फायदाच होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पावर भाष्य केलं. हा अतिशय मोठा हर्बल प्लांट आहे. आपल्याला आता संत्र्याचं उत्पादन वाढवावं लागेल. बाजारात न विकला जाणारा संत्रा या ठिकाणी विकत घेतला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. इतरही फळांची प्रोसेसिंग इथे होणार आहे. कोल्ड स्टोरेज व्यवस्था केली आहे. नवीन नर्सरी तयार करून चांगल्या पद्धतीचा संत्रा तयार करण्यात येणार आहे. आज रामदेवबाबा यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन उभारी आणणारा प्रकल्प सुरू केला. विरोधकांनी हा प्रकल्प एकदा पाहून घ्यावा, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. विदर्भात अन्न प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी जात होत्या. त्यामुळे गडचिरोली, मेळघाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हर्बल औषधी असल्यानं त्याचा फायदा होणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
नर्सरी तयार करणार
यावेळी रामदेव बाबा यांनीही प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पाची क्षमता रोजची 800 टनची आहे. नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी ज्यूस तयार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी येणार आहे. आज संत्र्याचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रोप तयार करण्यासाठी नर्सरी तयार करू. अन्य फळांचाही नैसर्गिक पद्धतीने ज्यूस काढण्याचं काम करू. संत्रा निर्यात करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. विदर्भासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातूनही संत्रा आयात करू, असं बाबा रामदेव म्हणाले.
Post a Comment