राज्यावर नवं संकट, अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; बळीराजा हवालदिल
सोलापूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला असून तेथील शेतीला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरास येथील टरबूज बाग उद्ध्वस्त होऊन मातीमोल झाली
एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवासेंदिवस चाळीशीच्या पल्याड जातं असल्याने फळपिकांना तग धरण मुश्किल झालं होतं. त्यातच आता अशा अचानक आलेल्या पावसामुळे टरबूज बाग नेस्तनाबूत झाली आहे. बार्शी तालुक्यातील राळेरास मधील शेतकरी मोतीबुवा गोसावी यांची साधारण एक एकर टरबूजाला याचा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचं चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.
शेतीसाठी खूप खर्च केला आहे. एक एकर कलिंगड लावलं होतं. पण त्याचा आता काही फायदा झाला नाही. पावसामुळे सगळं पीक उद्ध्वस्त झालं. जो खर्च केला होता, तोसुद्धा आता निघाला नाही. पाऊस, वारा यामुळे आमचं मोट नुकसान झालंय, एवढे पैसे टाकून, खर्च करून काही उपयोगच झाला नाही , असं सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
मिरज, सांगलीलाही पावसाने झोडपलं
मिरजेपाठोपाठ सांगली शहराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मिरज शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे मिरज शहरामध्ये काही वेळातच अवकाळी पावसाने दाणादान उडवून दिली. त्यानंतर सांगली शहरालादेखील अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. प्रचंड वादळी वाऱ्यासह सांगली शहरामध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार अवकाळी पाऊस पडला आहे.वादळी वारा व पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. तसेच कोल्हापूरमध्येही काल रात्री तासभर मुसळधार पाऊस पडला. अवकाळी आलेल्या या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
रत्नागिरीत तडाखा
रत्नागिरीच्या उत्तर रत्नागिरीतही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. काल रात्री ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. धामणी, तुळस, राजवाडी, संगमेश्वर भागामध्ये दीड तास तुफान अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला.
सिंधुदुर्ग आणि गोव्यात अचानक पावसाचा फटका
सोमवारी दुपारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांसह गोवा राज्याला अचानक पावसाने झोडापले. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, बांदा, आणि दोडामार्ग तालुक्यातील पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यमार्गांवर उन्माळलेली झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या भागात वाहनांच्या हालचालीवर गंभीर परिणाम झाला.
गोव्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी वाहतूक खोळंबली. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहनं अडकली. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठ्याचा बिघाड झाला परिणामी अनेक ठिकाणी लाइट बंद पडले.
हवामान खात्याने अधिक पावसाच्या अंदाजाची माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. प्रशासनाने रस्त्यांवर सफाई आणि मदतकार्य सुरू केले असले तरीही नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची आणि आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली.
मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार ?
दरम्यान येत्या काही दिवसांत मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान 36°C पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत तापमान साधारण 33°C च्या आसपास आहे.
हवामान विभागानुसार, शनिवारपासून तापमान वाढू लागेल आणि 31 मार्चपर्यंत 35°C पर्यंत घसरेल. या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. एप्रिल 1 ते6 दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) काही भागांत प्री-मान्सूनच्या हलक्या पावसाची शक्यता आहे.
मंगळवारी IMDच्या कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 32.5°C आणि सांताक्रूझ वेधशाळेत 33.5°C नोंदवले गेले. IMDच्या नोंदीनुसार, मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 28 मार्च 1956 रोजी 41.7°C नोंदवले गेले होते.
Post a Comment