ऐन शिमग्याच्या दिवसांमध्येच रेल्वे विभागाकडून मोठा निर्णय; इथून पुढं फलाटावर...
Central Railway Holi Special Train : प्रवासासाठी गावाकडे निघणार असाल तर, त्याआधी ही बातमी पाहून घ्या. रेल्वे विभागानं ऐन शिमग्याच्याच दिवसांमध्ये घेतलाय महत्त्वाचा निर्णय...
Central Railway Holi Special Train : शिमग्याचे दिवस म्हटले की कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढतो. फक्त कोकणच नव्हे, तर या दिवसांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं रेल्वे विभागानं वेळापत्रकानुसार धावणाऱ्या रेल्वेगाड्यांशिवायही Holi Special रेल्वे सोडण्यात आल्या येत आहेत.
एकिकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वेनं हा निर्णय घेतला असला तरीही दुसरीकडे मात्र याच वाढीव रेल्वेगाड्यांनी जाणाऱ्या प्रवाशांना स्थानकापर्यंत, रेल्वेपर्यंत सोडण्यासाठी सोबत येणाऱ्यांचा आकडा मोठा असल्यानं आता रेल्वे प्रशासनापुढं काही आव्हानं उभी राहत आहेत.
प्रवाशांना सोडण्यात येणाऱ्या कुटुंबीय आणि नातेवाईकांची रेल्वे स्थानकात गर्दी होत असल्यामुळं यामध्ये रेल्वेडब्यांपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना कैक अडचणींचा सामना करावा लागतो. इतकंच नव्हे तर, गर्दीवर नियंत्रण ठेवणं सुरक्षा यंत्रणेसाठीही आव्हानात्मक ठरतं. अशा परिस्थितीत मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीनं भुसावळ, नागपूर, पुणे विभागांतील सर्व रेल्वे स्थानकांवर 16 मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
होळीच्या धर्तीवर शहरांबाहेर किंवा बाहेरगावी जाणाऱ्यांचा मोठा आकडा पाहता त्यांच्यासोबत स्थानकात येणाऱ्यांचा राबता वाढणार आहे. या वर्दळीच्या माहोलामध्ये गर्दीचा लोंढा वाढून प्रवाशांची धक्काबुक्की होण्याची किंवा चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती उद्भवत असल्यानं कोणताही अनर्थ टाळण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांत प्रवाशांच्या गर्दीच्या नियोजनावर भर दिला जाईल. ज्याअंतर्गत यंत्रणांकडून विविध स्तरांवर सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात येईल. फलाट तिकीट विक्री बंद करणं हा त्यातीलच एक उपाय.
याव्यतिरिक्त रेल्वे स्थानमध्ये होणाऱ्या गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. तर, प्रवाशांना एकाच ठिकाणी थांबून न राहण्याचे आवाहनही रेल्वे फलाटावर जहीररित्या केलं जाणार आहे. वाढत्या गर्दीला अटकाव घालण्यासाठी म्हणून मध्य रेल्वे प्रमुख स्थानकांवर तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध आणेलय
कोणत्या स्थानकांवर नाही मिळणार तिकीटं?
रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण, पनवेल, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, नागपूर, पुणे या स्थानकांवर फलाट तिकीट मिळणार नाही. यामध्ये नियम व अटी लागू राहणार असून रुग्ण, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुलं यांना प्रवासासाठी लागणारी मदत पाहता त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला फलाट तिकीट दिले जाईल असंही मध्य प्रशासनानं स्पष्ट केलं.
दरम्यान मध्य रेल्वेप्रमाणं पश्चिम रेल्वेनं मात्र असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. असं असलं तरीही फलाटांवर होणारी गर्दी, प्रवाशांच्या हालचालींवर सुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्हीची करडी नजर असेल असं प.रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. इथं आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. ज्याअंतर्गत प्रवासाच्या दोन तास आधीपासून प्रवाशांना रेल्वे स्थानकात पोहोचता येणार आहे. त्यामुलं रेल्वे प्रवासाला निघताना या नियमांची माहिती असूद्या... प्रवास आणखी सुकर होईल.
Post a Comment