महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महापालिकेचा डंका, नंबर दोनला ठाण्याने मारली बाजी, जाणून घ्या
पुणे : ‘राज्य सरकारच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा’ या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका ठरली आहे. राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शंभर दिवसांचा कृती आराखडा’ उपक्रमाचा मध्यावधी आढावा २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वरिष्ठ राज्य आणि क्षेत्रीय प्रशासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे आयुक्त शेखरसिंह यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महापालिका संचालनालयाने राज्यातील २२ महापालिकांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सहा महापालिकांची यासाठी निवड केली होती. त्यामध्ये अंतिम मूल्यमापनामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला असून, ठाणे महापालिकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ई-प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट, नावीन्यपूर्ण कार्यक्रम आणि आधुनिक सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्याने महापालिकेला हे यश प्राप्त झाले आहे.
Post a Comment