कोळसा उत्पादनात भारताचा नवीन रेकॉर्ड; 42,315.7 कोटींची बचत, पंतप्रधानांनी पाठ थोपटली
India Coal Production : भारताने कोळसा उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे कोळसा उत्पादनात नवीन विक्रम नोंदवतानाच खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला आहे. 42,315.7 कोटींची बचत करण्यात यश आले आहे.
कोळसा उत्पादनात भारताने नवीन टप्पा गाठला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात या 20 मार्च रोजी देशाने एक अब्ज टन (BT) उत्पादनाचा टप्पा पार केला. ही मोठी उपलब्धी मानण्यात येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात 997.83 दशलक्ष टन (MT) कोळसा उत्पादन झाले होते. विशेष म्हणजे उत्पादनाचा हा रेकॉर्ड गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 दिवस आधी मिळाली आहे.
5 लाख खाण कामगारांना सलाम
कोळसा क्षेत्रात देशाने हा टप्पा सहज गाठला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपन्या, 350 हून अधिक कोळसा खाणींमध्ये कार्यरत 5 लाख खाण कामगारांनी हा सुवर्णक्षण खेचून आणलाच नाही तर साजरा करण्याची संधी सुद्धा दिली आहे. देशाच्या एकूण ऊर्जेत जवळपास 55% स्त्रोत हा कोळशावर अवलंबून आहे. देशातील सुमारे 74% वीज उत्पादन कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्पांवर अवलंबून आहे.
परकीय चलनाची झाली बचत
प्राप्त आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत भारताच्या कोळसा आयातीत 8.4% घट आली आहे. यामुळे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 5.43 अब्ज डॉलर्स म्हणजे 42,315.7 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोपटली पाठ
कोळसा उत्पादनातील या नवीन विक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्रातील सर्वांचीच पाठ थोपटली. त्यांना एक्सवर त्यांच्या भावना मांडल्या. “चालू आर्थिक वर्षात एक अब्ज टन कोळसा उत्पादन हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा पार करणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. ऊर्जा सुरक्षा, आर्थिक प्रगती आणि आत्मनिर्भरतेबद्दल आपल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया करताना पंतप्रधानांनी, ही कामगिरी कोळसा क्षेत्रातील सर्व संबंधित व्यक्तींच्या मेहनती आणि समर्पणाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.
रेड्डी यांनी केली घोषणा
उत्पादनातील ही भरारी देशाच्या वाढत्या वीज मागणीची पूर्तता करेल, आर्थिक वृद्धीला गती देईल आणि प्रत्येक भारतीयासाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करेल, असा विश्वास केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी व्यक्त केला. कोळसा मंत्रालयाने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी कोळसा उत्पादन लक्ष्य 108 कोटी टन निश्चित केले आहे.
Post a Comment