बापरे! ऊन, वारा, वादळी पाऊस.... सारंकाही; पुढच्या 24 तासात क्षणाक्षणाला रुपं बदलणार हवामान

 

Maharashtra Weather News: अवकाळी पाऊस इतक्यात पाठ सोडणार नाही... नव्यानं तयार होतंय अवकाळीसाठीचं पूरक वातावरण.  पाहा कसं असेल पुढील 24 तासांतील हवामान... 




Maharashtra Weather News: हिमालय पर्वतरांगांमध्ये नव्यानं एक पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं देशातील इतर भागांमध्येसुद्धा याचा परिणाम पाहायला मिळत आहे. मध्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत नव्यानं कमी दाबाची प्रणाली निर्माण होत असल्यामुळं वाऱ्यांच्या दिशांमध्येही सातत्यानं होणारे बदल सध्या नोंदवण्यात येत आहेत. इथं महाराष्ट्रात पश्चिम, उत्तर, मध्य प्रांतापासून विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत प्रत्येक भागात वेगळं हवामान पाहायला मिळत आहे. 

विदर्भामध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून, इथं तापमानाचा आकडा चाळीशीपार गेला आहे. पुढील 24 तासांमध्ये ही तापमानवाढ कायम राहणार असून, राज्याच्या मैदानी भागांमध्ये यामध्ये सातत्य दिसून येईल. परिणामी सातारा, सांगली, कोल्हापूरात तापमानवाढ अपेक्षित आहे. याचवेळी पश्चिम महाराष्ट्राच्याच भागांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणामांमुळं दिवस मावळतीला गेल्यानंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ वगळता दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये अवकाळीचा तडाखा पुन्हा बसण्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. 

नुकत्याच झालेल्या अवकाळीचा राज्याला प्रचंड फटका बसला असून, 7 जिल्ह्यांत अवकाळीचा कहर पाहायला मिळत आहे. अवकाळीमुळे शेती आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं असून यामध्ये कोकण, पश्मिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांना फटका बसला आहे. यामध्ये सोलापूर, नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली हे जिल्हे सर्वाधिक प्रभावी असून चालू आठवडा अखेरीपर्यंत अवकाळीचं हे सावट अद्याप विरताना दिसणार नाहीय. ज्यामुळं राज्यात काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांमध्ये दमट वातावरणात वाढ झाल्यामुळं वातावरणात एक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये कमाल तापमानात काही अंशांची घट झाली असली तरीही उष्मा जाणवणं मात्र कायमच आहे. ज्यामुळं नागरिकांची अद्यापही या उकाड्यातून सुटका नाही हे स्पष्ट. 


No comments

Powered by Blogger.