जाणून घ्या,‘या’ फुलांचे औषधी गुणधर्म

घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर घरात भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि दारापुढे एक बगीचा किंवा तुळशीचं वृंदावन असावं असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा आवड म्हणून किंवा दारापुढे शोभा वाढावी म्हणून आपण फुलझाडं लावतो. परंतु काही फुलं हे केवळ सुगंधच देत नाहीत, तर त्यांचे औषधी गुणधर्मदेखील आहेत. चला तर मग पाहुयात अशाच काही औषधी गुणधर्म असलेल्या फुलझाडांविषयी. –
१.जास्वंदाचे फुल –
गणपतीच्या आवडतं फुल म्हणजे जास्वंद. लाल चुटूक रंगाचं हे फुल अत्यंत सुंदर दिसत असून या फुलामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे जास्वंद या नावापेक्षा हिबस्कस या नावाने या फुलाचे प्रोडक्ट जास्त लोकप्रिय आहेत. हिबस्कस टीचे अनेक फायदे आहेत. लाल रंगाच्या जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच जास्वंदाच्या फुलाचे पावडर स्वरूपात सेवन केल्याने केसगळती थांबते. तसेच ही पावडर यकृताच्या आजारांवर गुणकारी असते, बद्धकोष्ठावर उपचार म्हणून ही पावडर वापरण्याचा सल्ला अगदी आयुर्वेदातही देण्यात आला आहे. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात हिबस्कस पावडर सहज उपलब्ध असते.
२. लॅव्हेंडरचे फुल –
साधारणपणे लॅव्हेंडरची फुलं ही सजावटीसाठीच वापरली जातात. तसंच या फुलांची पावडर किंवा सिरपदेखील केलं जातं. या पावडरचा आणि सिरपचा वापर आइस्क्रिम किंवा अन्य पदार्थांमध्ये चव वाढविण्यासाठी केला जातो. या फुलांच्या पावडरचा वापर अँटी-ऑक्सिडेंट म्हणून केला जातो. मधुमेहावरील नैसर्गिक उपचार, मुड स्वींग तसेच ताणावरील उपाय, जखमेवर लावण्यासाठी, त्वचा तसेच केसांच्या आरोग्यासाठी, डोकेदुखीवर आणि झोपेशी संबंधित आजारांवर या फुलाच्या पावडरीचा वापर समान्यपणे केला जातो.
३. गुलाब –
फुलांचा राजा म्हणून गुलाबकडे पाहिलं जातं. गुलाब लाल, पिवळ्या, गुलाबी , केशरी अशा विविध रंगामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. गुलाबापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. गुलाबपाणी, गुलकंद, गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर अशा विविध पद्धतीने गुलाबाचा वापर केला जातो. हे फुल हृदयाचे आजार, कर्करोग आणि मधुमेहासारखे आजारांवर रामबाण औषध आहे. याशिवाय पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, चेहऱ्यावरील पुळ्या आणि डाग नैसर्गिक उपचारांद्वारे घालवण्यासाठी गुलाब गुणकारी ठरतो.
४. सफरचंद आणि संत्र्याची फुलं –
या दोन्ही फळ झाडांची फुले परदेशात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमांतून खाल्ली जातात. या झाडांच्या फुलांची पावडर किंवा अंश असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. उच्च रक्तदाब, रक्त शुद्धी, त्वचेचा पत सुधारण्यासाठी ही फुले गुणाकरी ठरतात. या फुलांच्या औषधी गुणधर्माबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. ऑरेंज ब्लॉसम टी, अॅपल ब्लॉसम टी या नावाने या फुलांच्या चवीची चहापावडर अनेक सुपरमार्केट्समध्ये सहज उपलब्ध असते.
५. शेवंती –
शेवंतीच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि मिनरल्स असतात. क्रिझॅन्थरम नावाने या फुलांच्या नावाची चहा पावडर सुपर मार्केटमध्ये सहज मिळते. तर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानातही या फुलाच्या पाकळ्यांची पावडर उपलब्ध असते. या फुलाच्या पावडरीचा उपयोग छातीतील दुखणे, उच्च रक्तदाब, टाईप टू प्रकारचा मधुमेह, ताप, सर्दी, डोकेदुखी, शिंक येणे, सूज आल्यास त्यावर उपचार करण्याऱ्या औषधांमध्ये केला जातो.
६. झेंडू –
सणासुदीच्या दिवशी प्रत्येकाच्या दारावर झेंडूच्या फुलांची तोरणं दिसतात. तसंच कोणत्याही शुभ कार्यात आवर्जुन या फुलांचा वापर केला जातो. झेंडूमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जखम झाल्या किंवा किडा-मुंगी चावल्यास या फुलांच्या पाकळ्यांची पावडर प्रभावित जागेवर लावली तर वेदनेपासून आराम मिळतो. तसंच काही ठिकाणी चहामध्येदेखील या फुलांच्या पावडरचा वापर करतात. या चहाच्या सेवनाने पोटातील गॅसेसचा, पोटात अचानक कळ येण्याचा त्रास कमी होतो.

No comments

Powered by Blogger.